खाशाबा जाधव, एक संघर्षकथा

Subscribe to our newsletter

वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी गावाकडच्या कुस्तीच्या हंगामात दोन मिनिटांत खाशाबा जाधव यांनी केलं होतं प्रतिस्पर्ध्याला चीत! पुढं जाऊन ठरले देशाचे पहिले ऑलिम्पिकवीर.

स्वतंत्र भारताला जागतिक स्तरावर ऑलिम्पिकसारख्या मोठया स्पर्धेत, कुस्तीमध्ये पहिलं कांस्यपदक मिळवून देऊन भारतीयांच्या अभिमानात भर टाकणाऱ्या कुस्तीपटूचं नाव आहे, खाशाबा जाधव. त्यांनी ऑलिम्पिक पदकाची जी पाऊलवाट तयार केली, त्याच वाटेनं चालून आज कित्येक खेळाडू आपापल्या क्षेत्रात देशाचं नाव जगात कोरत आहेत.

पण ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत पोहचण्यासाठी संघर्षाची कठीण वाट तुडवावी लागते. तशी ती खाशाबांनाही तुडवावी लागली होती.

आज आपण पाहतो की जागतिक स्पर्धेत आपल्या खेळाडूला उतरवण्यासाठी देश  सगळा खर्च करतात. खेळाडूला तिथं फक्त चांगला खेळ करायचा असतो. त्याशिवाय त्यांना सरकारकडून खेळाचं वैयक्तिक मूल्यही मिळतं. पण खाशाबांच्या काळात असं काहीही नव्हतं. त्यावेळी आत्ताएवढं सरकार खेळात रस घेत नव्हतं.

AD

खाशाबा यांनी स्वतःच्या बळावर खडतर वाटेवरून ऑलिम्पिकपर्यंतचा  प्रवास केला. जिद्दीला जर कष्टाची जोड असेल ना, तर यश हमखास मिळतंच. यशाच्या मागे धावण्यापेक्षा यशाला आपल्या मागे धावायला लावायचं, असं खाशाबांचं मत होतं.

बाळकडू

१५ जानेवारी, १९२६ रोजी सातारा जिल्ह्यातील रेठरेलगत असणाऱ्या गोळेश्वर गावात खाशाबांचा जन्म झाला. ते खेडं विचारांनी फारसं प्रगत नव्हतं. जगण्यात झालेले आधुनिक बदल गावापर्यंत यायला खूप वेळ लागायचा. पण खाशाबांचं कुटूंब थोडं आधुनिक विचारसरणीला धरून चालण्याचा प्रयत्न करायचं.

कुस्तीचे  धडे  खाशाबा त्यांच्या आजोबांकडून आणि वडिलांकडून शिकले.  त्यांचे आजोबा नानासाहेब जाधव हे पंचक्रोशीतील प्रसिद्ध पहिलवान होते आणि वडील दादासाहेबही. पिढ्यान् पिढ्या पहिलवानकीला वाहून घेतलेल्या पूर्वजांची प्रेरणा घेऊन वयाच्या आठव्या वर्षी अवघ्या दोन मिनिटांत त्यांनी पहिली कुस्ती जिंकली. उभारी येण्यासाठी फक्त सुरुवात चांगली व्हायला हवी. एकदा एका विश्वासानं आयुष्यात ठाण मांडलं, की मग भय राहत नाही. पहिल्यांदा चीत केलेल्या कुस्तीने त्यांना आयुष्यभराचं बळ दिलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजींनी त्यांना खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांनी खाशाबांचं टॅलेंट ओळखलं होतं. ‘ योग्य मार्गदर्शनाखाली जर याला शिक्षण दिलं तर हा नक्कीच देशाचं नाव जगात करेल’, असा गुरुजींचा विश्वास पुढं खाशाबांनी खरा केला.

१९४२ मध्ये, महात्मा गांधीजींच्या आयोजनाखाली ‘ भारत छोडो, चले जाव ’ या आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात भागसुद्धा घेतला होता. कारण जर देश स्वतंत्र झाला तरच आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकू, आपला खेळ सुद्धा स्वतंत्र होऊ शकेल आणि मग त्याचा इतरांना देखील फायदा होईल, असं त्यांचं  मत होतं. 

दुर्दैवाने देश स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा खाशाबांना काहीच मदत मिळाली नाही. तरीही त्यांनी स्वतः, मित्रांच्या व गुरुजींच्या मदतीने खर्च करून ऑलिम्पिकमध्ये जाण्याची तयारी जोमाने सुरु केली. 

१९४८ मध्ये पहिल्यांदा खाशाबा यांची लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्लायवेट गटात निवड झाली. ते स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर पोचले. पहिल्याच संधीत सहाव्या क्रमांकावर पोहोचणारे देशातील ते एकमेव होते. ‘आता पुढची ऑलिम्पिक खेळायचीच पण हारण्यासाठी नाहीतर जिंकण्यासाठी ’, असं खाशाबांनी ठरवलं होतं.

१९५२ मध्ये पुन्हा त्यांनी हेलसिंकी ऑलिम्पिकसाठी जोरदार तयारी करून देशाच्या राष्ट्रीय निवड चाचणीत भाग घेतला. तिथं त्यांना कमी मार्क मिळाल्याने निवड चाचणीतून बाहेर काढण्यात आलं. पण ‘मला जाणुन बुजून कमी मार्क दिलेले आहेत. माझ्यासोबत खूप चुकीचं घडलं आहे’, असं त्यांनी पतियाळाच्या महाराजांना सांगितल्यावर त्यांनी तो मुद्दा उचलून धरला कारण महाराजांनाही कुस्तीची प्रचंड आवड होती. शेवटी निवड चाचणीला याची दखल घेऊन पुन्हा खाशाबांची चाचणी घ्यावी लागली. त्यात ते पास झाले आणि  हेलसिंकी ऑलिम्पिकसाठी भारताचं प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरले. 

सरकारने त्यावेळी जर त्यांना सगळ्या गोष्टीत सहकार्य केलं असतं, तर नक्कीच देशाला सुवर्णपदक मिळालं असतं.

पण तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिथे जाऊन ५७ किलो गटात फ्री स्टाईल मध्ये त्यांनी शेवटी कांस्यपदकापर्यंत मजल मारली. देशाला पहिलं पदक मिळवून दिलं, तेही जागतिक पातळीवर. त्यावेळी खाशाबांनी म्हणाले,  ‘मातीचा सराव असलेल्या खेळाडूंचे पाय ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत जिथे गादी वापरली जाते तिथे घसरतात, तिथं खेळणं त्यांना जरा जड जातं. आखाड्यात कितीतरी कुस्त्या जिंकलेल्या असताना ऑलिम्पिकमध्ये मला फक्त कांस्यपदकचं मिळवता आलं. पण जर गादीच्या खेळाचा सराव असता तर देशासाठी सुवर्णपदक मिळवून दिलं असतं.’

यावरूनच लक्षात येतं की खाशाबांचं काय दु:ख  होतं ते. सरकारने त्यावेळी जर त्यांना सगळ्या गोष्टीत सहकार्य केलं असतं, तर नक्कीच देशाला सुवर्णपदक मिळालं असतं. आज ऑलिम्पिकमध्ये नुसती निवड जरी झाली तरी खेळाडूला पैसे आणि सगळ्या सुविधा पुरवल्या जातात. पण त्याकाळी खाशाबांनी तर देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं  तरीही नंतर त्यांना सरकारकडून फारसं सहकार्य मिळालं नाही. त्यांना पोलीस खात्यात उपनिरीक्षकाची नोकरीही खूप विनंती केल्यावर तब्बल चार वर्षांनी दिली गेली. तीही २२ वर्षांपर्यंत एकही बढतीशिवाय. तरीही  त्यांनी ती प्रामाणिकपणे  केली. प्रशिक्षक म्हणून काम करण्याच्या त्यांच्या  इच्छेचीसुद्धा देशाने दखल घेतली नाही. शेवटी एका मोटार अपघातात त्यांचं १४ ऑगस्ट १९८४ मध्ये निधन झालं.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More