काटेरी पोह्याचा चिवडा

Photo by Kaushik Borah from Pexels
11,508
Subscribe to our newsletter

हॉस्टेल च्या दिवसात आई ने केलेले बेसनाचे लाडू आणी आजीच्या हाताचा काटेरी पोह्याचा चिवडा सगळ्यांना आवडायचा. आमचा ४-५ जणांचा घोळका मग चिवड्यावर ताव मारायचा. त्या काळी चिवडा ‘चखना’ या नावाने काही ठिकाणी प्रसिद्ध आहे हे माहित नव्हते.

तर ह्या काटेरी पोह्याचा अर्थात भाजक्या पोह्यांचा चिवडयाचा डबा उघडला की जणू सुखाचे दार उघडायचे. सुखाची व्याख्या काय तर प्रत्येक घासात एक तरी दाणा हवा. पहिला दिवस जाम मज्जा यायची. मग जशी ह्या डब्याची बातमी बाकीच्या मजल्यावर जायची तसे बाकीचे मित्र दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रूम वर गोळा व्हायचे. परत डबा उघडला जायचा, फरक इतकाच कि प्रत्येक घासाला दाणा प्रत्येकाला मात्र मिळायचा नाही. पण दोन तीन घासा नंतर आलेला ‘तो’ दाणा अरे मेरेको मिला असा राष्ट्र भाषेत साजरा व्हायचा. दोन दिवसात डबा बर्यापैकी रिकामा झालेला असायचा. सकाळी सकाळी मग एखादा तनतणत यायचा, आणि म्हणायचा मला आज कळतंय आणि चिवडा येऊन २ दिवस झालेत. मग डबा गोल गोल करत वरवरचे पोहे गोळा करत मसाला तळात सोडून दोन तीन बकाणे आणी नुकतच बाटलीत भरून आणलेलं पाणी पिऊन तृप्त होवून कोणत्या तरी क्लास ला निघून जायचा. जाताना कमाल झालाय बॉस चिवडा अस म्हणत मगाचा राग पण विसरायचा. सर्वात शेवटी रविवारी रात्री जेव्हा मेस ला सुट्टी असायची कोणी तरी पोळ्यांचे पाकीट आणि तेल घेऊन यायचं. तळातल्या उरलेल्या गाळातून डाऴ , जीरा खात बाकीच्या मसाल्यावर ते तेल टाकून, मसाला पण पोळीबरोबर फस्त व्हायचा.

पुढे आम्ही सर्व जण शिक्षणात पास झालो, कोणी आवडत्या ठिकाणी पोचला तर कोणी नशिबाने जिथे नेले तिथे गेला. कुणी प्रेमात पडला, तर कुणी प्रेमात पडला. आता अधून मधून FB आणी WhatsApp मुळे बरेच जण परत भेटलेत. आयुष्य मात्र मजेशीर आहे, अगदी भाजक्या पोह्याचा चिवड्यासारखे. काही जणांना प्रत्येक घासांत सुख मिळालं तर काहीना मसाला तेल खाऊन, एक मात्र छान आहे कि सर्व जणं खुश आहेत. काटेरी असलं तरी आयुष्य चवदार आहे.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More