एक अनुभव…

1,017
Subscribe to our newsletter

करोनाकाळात एक मेडिकल विद्यार्थी म्हणून पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये काम करताना

संपूर्ण जगासाठी २०२० हे वर्ष इतर वर्षांपेक्षा वेगळचं ठरलं. कोविड-१९ हा रोग जितका भराभर पसरत गेला, तितक्या वेगाने एखाद्या टेक्नोलॉजीचाही प्रसार झाला नसावा. प्रत्येक देशात, राज्यात आणि शहरात हीच परिस्थिती. यात महत्वाची जबाबदारी होती ती रुग्णसेवकांच्या खांद्यावर. एरवीही हे रुग्णसेवक सतत कामावर असतात, त्यांना कधीही तत्काळ कामावर रुजू व्हावं लागतं, सतत रुग्णसेवा करावी लागते, मात्र २०२०चा करोनाकाळ या रुग्णसेवाकांकारिता अत्यंत धकाधुकीचा आणि कर्तबगारीचाही होता. मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाले. करोनाच्या वाढत्या साथीमुळे देशभरात घरातून बाहेर पडण्यावर बंदी आली. शक्य तितक्या कंपन्यांचे काम घरून सुरु झाले, इतर सर्वजणांनाही घरी थांबण्याची पाबंदी होती. आरोग्याच्या भीतीने प्रत्येकजण काळजीही घेत होता. मात्र अशावेळी रुग्णसेवक आणि सुरक्षाकर्मी सतत काम करीत होते.

हॉस्पिटलमध्ये नोकरी करणाऱ्यांसह शिकणारे मेडिकलचे विद्यार्थीही तितकेच महत्वपूर्ण कार्य करत होते. अशाच पुण्यातल्या मेडिकल शाखेतील विद्यार्थ्यांचा हा अनुभव..

करोनामुळे आमच्या इतर शाखेतील सर्व मित्र-मैत्रिणींच्या कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली. मात्र आम्हाला कॉलेजला जाणे भाग होते. मेडिकल शाखेत उच्चपदवीला असताना अभ्यासाचा एक भाग म्हणून आम्हाला हॉस्पिटलमधील कामाचा अनुभव महत्वाचा असतो त्यामुळे बाकी वर्गांसह हॉस्पिटल मधील ड्युटीचा भागही आम्हाला सांभाळावाच लागतो. अशात करोनाच्या बातम्या कानावर येऊ लागल्या. एक डॉक्टर म्हणून आणि मेडिकल विद्यार्थी म्हणून आम्हाला हॉस्पिटलला जावेच लागणार आहे हे आम्हाला माहीत होते. आमचे शिक्षक आम्हाला हिंमत देत पाठीशी उभे होते, तरीही मनात भीती होतीच. वरून घरच्यांनाही सतत आमची काळजी वाटत होती.

AD

तरीही न थकता सर्वानीच आपले कर्तव्य पुरेपूर बजावले आणि अजूनही बजावताहेत.

घरातून बाहेर पडताना सर्व रस्ते ओस पडलेले दिसायचे. एखाद्या डॉक्टरची गाडी किंवा चौकाला उभे पोलीस एवढे लोकं दिसलेत तर त्याव्यतिरिक्त सगळा शुकशुकाट. त्यात पुण्यात करोना रुग्णांच वाढतं प्रमाण मनात धगधग निर्माण करणारं होतं. मात्र या भीती आणि काळजीपेक्षाही मोठे होतं ते कर्तव्य. सर्वीकडे बंदी असताना बस, ऑटो सारखी सार्वजनिक वाहनेही बंद करण्यात आली होती. अशामध्ये जे डॉक्टर्स या वाहनांनी प्रवास करायचे त्यांची फार पंचाईत झाली. वेळेची धावपळ आणि मिळेल ते वाहन अशी परिस्थिती झाली होती. केवळ अत्यावश्यक सेवांकरता सुरु ठेवण्यात आलेल्या अगदी थोडक्या बसेसमुळे काही प्रश्न निभावले. महत्वाचं म्हणजे अशावेळी अत्यावश्यक सेवेतील कामावर रुजू असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आम्हाला मदत झाली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर आम्ही नेहमीच आवश्यक ती काळजी घेत असू मात्र आता अगदी कटाक्षाने स्वच्छतेकडे देण्यास सुरवात केली मुख्य म्हणजे आपली स्वच्छता आणि इतरही स्वच्छता बाळगताहेत की नाही याकडे लक्ष देणे. प्रश्न सर्वांच्याच सुरक्षेचा होता.

हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वच्छतेचे पुन: प्रशिक्षण देण्यात आले. हॉस्पिटलमधले रुग्ण तपासताना प्रत्येकवेळी हात स्वच्छ करणे आणि मगच बाकी कामे करणे यात मुळीच हलगर्जीपणा चालणार नव्हता. इतरांसोबत सुरक्षित अंतर राखून हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक  रुग्णाच्या बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देणे, प्रत्येक नव्या गोष्टीला हात लावताना सॅनिटायझरचा वापर करणे, दिवसभर सर्व कामे करत असताना तोंडावर लावलेल्या मास्कला हात न लागू देणे, येणाऱ्या रुग्णांना करोनाचे एखादेही लक्षण नाही ना ते बघणे, त्यांना स्वच्छतेविषयी समजावणे यासोबतच सारखी सर्दी-खोकला होणाऱ्या रुग्णांना मानसिक आधार देणे ही नैतिक जवाबदारीही आम्ही पार पडत होतो. काही काळाने जागेच्या कमतरतेमुळे येणाऱ्या नव्या रुग्णांना कुठे अॅडमिट करावे असेही काही प्रश्न उभे झाले होते. तरीही न थकता सर्वानीच आपले कर्तव्य पुरेपूर बजावले आणि अजूनही बजावताहेत.

‘कामाचा कुठलाही पगार किंवा पावती मिळत नसली तरीही मेडिकलचे विद्यार्थी होऊन करोनाच्या या संकटकाळात गरजेच्यावेळी आम्हाला रुग्णसेवा करता आली याच खूप समाधान वाटतंय.’

खरच! असे काही अनुभव ऐकले की मनाला प्रश्न पडतो की हे रुग्णसेवक आणि अश्या संकटकाळी मदत करणारी प्रत्येक व्यक्ती तर नक्कीच आपल्या कर्तव्याचे अगदी निष्ठेने पालन करतेय आणि आज आपल्या सर्वांना एक सुरक्षित आयुष्य देण्यासाठी झटतेय. परंतु आपणही तेवढ्याच परीने  त्यांच्या जोडीला जोड देऊन या सर्व कार्यात त्यांची मदत करायला हवी. आपल्याच सुरक्षिततेसाठी त्यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन आपण करायला हवे.. ते आपण करतोय का ??? यावर नक्कीच विचार करायला हवा.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More