दोन बन मस्का विथ स्पेशल चाय!

Subscribe to our newsletter

पुण्यातील इराणी खाद्य संस्कृती

पुणे शहर हे विविध खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण, कोल्हापूर, सोलापूर, सातारा अशा महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच भागातले खाद्यप्रकार पुण्यामध्ये बघायला मिळतात आणि चाखायलाही. त्यासोबतच इतर देशांतील खाद्यप्रकारही मोठ्या चलनात आहेत. उगीच नाही म्हटलं जात, ‘पुणे तिथे काय उणे’. 

या सर्व प्रकारांमध्ये वर्षानुवर्षे काय टिकून राहिलंय माहिती आहे? इराणी कॅफे! तुम्ही कधीतरी इराणी कॅफेमधला ‘बन मस्का’ खाल्लाच असेल. त्या दोन पावांमध्ये दमकून भरलेले खूप सारे बटर म्हणजेच लोणी तुमच्या जिभेवर दीर्घकाळ रेंगाळत राहीलं असेल. आणि ती अप्रतिम चव पुन्हा पुन्हा आठवून तुम्ही इराणी खाऊकट्ट्यावर धाव घेत असाल. पुण्यातल्या विविध इराणी कॅफेमध्ये मिळणारे बनमस्का आणि चहा म्हणजे अहाहा, ‘द बेस्ट कॉम्बिनेशन’!

ऐतिहासिक माहितीनुसार सोळाव्या-सतराव्या शतकात इराणी लोकं भारतात आले.  त्यानंतर इराण-इराक युद्धाच्यावेळी आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळेदेखील अनेक इराणी लोक भारतात स्थायिक झाले आणि त्यांनी भारतीय संस्कृतीनुसार जगण्यास सुरवात केली. 

असं म्हणतात की पहिल्या महायुद्धानंतर भारतात स्थलांतरित होणाऱ्या इराणी लोकांची संख्या अजून वाढली. भारतात ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाल्यानंतर ब्रिटिश छावण्यांच्या आसपास या इराण्यांनी उपजीविकेसाठी चहाची दुकानं थाटण्यास सुरवात केली. त्यातलाच एक प्रकार म्हणजे इराणी चहा.

पुण्यातील इराणी कॅफेज  

डेक्कन भागातील कॅफे गुडलक हे ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेलं एक   इराणी हॉटेल. इथल्या बनमस्कासह चहा पिण्यासाठी पुणेकर नंबर लावून उभे असतात. या इराणी चहाची एक खासियत अशी की यामध्ये उकळलेल्या चहात वरून दूध न टाकता एका विशिष्ट प्रमाणातील दुधात ब्लॅक टी ओतला जातो. 

इराणी चहाव्यतिरिक्त इतरही इराणी पदार्थ पुण्यात प्रसिद्ध आहेत. रुबी हॉल क्लिनिकजवळील वहुमन कॅफे येथील ‘चीज ऑम्लेट’ म्हणजे अंडाप्रेमींचा आवडता पदार्थ. अगदी शहराच्या कानाकोपऱ्यातून येथे पुणेकर हे चीज ऑम्लेट खायला येतात. 

पुण्यातील कॅफे ऑलिंपिया, कॅफे पॅराडाईझ, द इराणी कॅफे, कॅफे डायमंड क्वीन, कॅफे गार्डन, कॅफे अल्फा अशा कित्येक कॅफेमध्ये इराणी पदार्थांची नुसती चंगळ असते. त्यात पट्टी सामोसा, क्रीमरोल, कबाब, बन मस्का जाम, खिमा पाव, चिकन बिर्याणी, चिकन ऑम्लेट, अंडा भुर्जी, रोस्ट मटन असे व्हेज आणि नॉनव्हेज अनेक ऑप्शन्स आहेत. 

इराणी कॅफेंसह इराणी बेकरीमधील मावा केक, कोकोनट केक, नानकटाई सारखे पदार्थही पुणेकरांचे ‘ऑल टाईम फेवरेट’ आहेत. 

इराणी कॅफेची वैशिष्ट्ये 

इराणी कॅफेमध्ये गेल्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, ती म्हणजे तिथल्या बैठकीतील लाकडी खुर्च्या आणि स्टीलचे गोल टेबल्स. हे डेकॉर सगळ्या कॅफेमध्ये दिसून येतं. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या इराणी हॉटेल्सच्या नावांमागे ‘कॅफे’ हा शब्द प्रामुख्याने जोडलेला असतो.

पुण्यातल्या इराणी कॅफेंमध्ये ज्याप्रमाणे पारंपारिक इराणी पदार्थ मिळतात, त्याचप्रमाणे या लोकांनी पुण्याची खाद्यसंस्कृतीही अंगिकारली आहे. त्यामुळे अनेक इराणी कॅफेमध्ये इडली, बटाटावडा, मेदुवडा, उत्तपा, पोहे, उपमा, शिरा, मसाला डोसा असे अनेक पदार्थदेखील अगदी सकाळपासून उपलब्ध असतात. सकाळी कामासाठी बाहेर पडणाऱ्या सर्वांसाठी एकाच ठिकाणी इराणी खाद्यपदार्थांसह मराठमोळी खाऊपर्वणी उपलब्ध असते.

पुण्याच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे इथली खाद्यसंस्कृती. त्यात इराणी खाद्यसंस्कृतीने आपलं एक वेगळं अढळ स्थान निर्माण केलंय.

जर तुम्ही या इराणी कॅफेमधल्या खाद्यपदार्थांची चव आजतागायत कधी घेतलीच नसेल किंवा जर तुम्ही पुण्यात नवीन असाल, तर एकदातरी हे पदार्थ नक्कीच चाखा. आमचा दावा आहे की तुम्ही तत्काळ त्यांच्या प्रेमात पडाल. 

cafe good luck punedeccanirani cafes in puneirani chaiirani food