Categories
Kavadse

नववी फेल

काय रे ? किती शिकला आहेस की डायरेक्ट पाणी पुरीचा ठेला सुरू केला?

काहीही न बोलता प्लेट पुसत त्याने त्यात एक मस्त तिखट पाण्याने भरलेली पाणी पुरी ठेवून माझ्या समोर धरली.

माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाले नसल्याने मी नवीन काही विषय काढला नाही. आणि ती पुरी तोंडात कोंबली. इतक्यात शाळेच्या गणवेशात दोन मैत्रिणी आल्या. त्याने दोन पुऱ्या एकाच प्लेट मध्ये ठेवून त्यांना दिल्या. कोणत्याही संभाषणाशिवाय झालेला व्यवहार हा कधीच पाहिला नसतो. म्हणजे पानाच्या टपरीवर नुसतं पोचल्यावर आधीच बांधून ठेवलेलं पान, हवी तीच विडी- काडी, बार मध्ये बसता क्षणी समोर आलेली हवी ती दारू माणसाला आपण कोणी तरी आहोत आणि आयुष्यात कुठे तरी पोहचलो आहोत ह्याचा एक सुप्त आनंद देत असते.

तसाच काहीसा आनंद त्या मुलींच्या चेहऱ्यावर दिसत होता. नाही तर त्या पाणी पुरीत परत खाण्या सारखे काही नव्हते असे मला वाटले. कदाचित माझ्या प्रश्नाचे उत्तर त्याने टाळले म्हणून देखील असेल. त्या मुलींची वन बाय टू पाणी पुरी संपली आणि त्या निघून पण गेल्या. मी अजून शेवटच्या २ पुऱ्या आणि त्यातून सांडलेले तिखट पाणी बघत तोंडातली पुरी चावत होतो.

९ वी फेल आहे. वाचता सगळं येत.

त्याच्या उत्तराने मी माझी लय बिघडू दिली नाही. आणि पुढची पुरी तोंडात कोंबली. तो पुढे म्हणाला ८ वी पर्यंत सगळं ठीक होतं. म्हणजे ४-५ वी पर्यंत फेल व्हायचा प्रश्नच नव्हता. आणि नंतर मटण आणि चपटी दिली की ६ नंतर ९ वी पर्यंत रस्ता सोपा होता.

माझी प्लेट तोंडाला लावून त्यातलं तिखट पाणी मी संपवलं.

अरे मग ९ वी कसा फेल झालास?

सर, आमचे शिक्षक वयोमानामुळे वारले. अरे मग मटण आणि चपटी नव्याला नाही दिली का?
नाही ना सर, म्हणून तर फेल झालो. कशी देणार? सर गेले आणि त्यांच्या मुली ला त्यांच्या जागी बदली काम मिळाले.

ठीके म्हणजे ९ वी मध्ये तुमचे मटण आणि चपटी चे पैसे वाचले म्हणायचे. आम्ही दोघे जण त्यावर मनसोक्त हसलो.

त्याने मसाला पुरी माझ्या रिकाम्या प्लेट मध्ये ठेवली. ती खाल्ल्यावर पाणी पुरीची चव त्या मसाला पुरी पेक्षा जास्त चांगली होती असं जाणवलं. त्याच पण तसच होत, ८ वी पर्यंत.