Categories
Kavadse

ताजमहाल

दशभुजा मंदिराजवळ कोणाची तरी वाट पाहत उभा होतो. रस्त्यावर रोजाचीच वर्दळ होती. नेहमीचे फुलवाले, भिक्षा मागणारे आणि भक्त ह्याने परिसर भरला होता.

दशभुजा मंदिराजवळ कोणाची तरी वाट पाहत उभा होतो. रस्त्यावर रोजाचीच वर्दळ होती. नेहमीचे फुलवाले, भिक्षा मागणारे आणि भक्त ह्याने परिसर भरला होता.

खांद्यावर रडक्या मुलाला घेऊन एका माणसाची घालमेल चालू होती. परिसराच्या लयीला सोडून कोणी वागत असला की आपलं लक्ष तिकडे जाते माझे पण गेले. तो कोणाकडे काही मागत नव्हता पण त्याची घालमेल इतरांसारखी नसल्याने मी त्याच्या कडे बघत उभा होतो. त्याच्या दोन्ही खांद्यावरून पाय टाकून बसलेलं ते पोर आता धाय मोकलून रडत होते.

मी त्याच्या कडे बघतोय पाहून तो धीर करून माझ्याकडे आला. साहेब थोडे पैसे हवे होते.
मी त्याच्या कडे दुर्लक्ष केलं. कारण गावी जायला पैसे मागणारा एक प्रवासी अनेक वर्ष पुण्यात निरनिराळ्या ठिकाणी मी पाहिला आहे. त्या मुळे ह्या माणसाला पैसे द्यायचा प्रश्नच नव्हता.
साहेब १० दिवसांपूर्वी होते नव्हते ते पैसे घेऊन निघालोय. पुण्यात पोहचलो तेव्हा २० रुपये होते आणि आता नाश्ता केल्यावर ते पण संपले आहेत.
कुठे जायचं आहे तुम्हाला? मी फारशी दाखल घेतोय असं न वाटू देता विचारले.
मुलाला ताजमहाल बघायचा आहे. दोघं जण आग्र्याला निघालोय.
त्याच्या उत्तराने माझ्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघत तो म्हणाला, पैसे आहेत तो पर्यंत बसने अथवा ट्रेन ने आणि संपले की चालत असा आमचा आग्ऱ्याच्या दिशेने प्रवास चालू केला. आता पैसे संपले म्हणून रडतोय हा. मी त्या मुलाकडे पाहून विचारले, खरंच जायचे आहे का तुला आग्र्याला? त्याने मान हलवून होकार दिला. का बरं जायचंय आग्र्याला? कारण मला ताजमहाल बघायचाय.

प्रश्न खूप अवघड होता पण त्याचे उत्तर खूप सहज आणि सोपे होते. आपसूकच माझा हात खिशात गेला. हाताला लागले तेवढे पैसे न मोजता त्यांच्या हातात दिले. त्याच्या वडिलांनी मला सलाम केला आणि ते चालायला लागले.

ज्याला खरंच ताजमहाल पाहायचा आहे त्याला तिथे कसं पोहचता येईल हा प्रश्नच नसतो. पैसे असतील तर वाहन आणि नसतील तर चालत… इच्छा किती प्रबळ आहे ह्यावर सगळं ठरतंय. खरंतर सगळ्याच गोष्टी अश्याच असतात, आपल्या मनाला त्या छोट्या मुलासारखे खांद्यावर बसवले की झाले. शिक्षण,करिअर , प्रवास, ध्यास, प्रेम ह्या सगळ्याला इच्छा मनापासून असली की काम होतंच.

परत वळून त्या दोघांकडे बघितले आणि त्यांच्या इच्छेला आणि दिशेला सलाम केला.