Categories
Kavadse

Better luck next time

एखादा दिवस उगाचच कंटाळा आल्यासारखं वाटतं. माझ्या बाबतीत मी फारस असे होऊ देत नाही पण तरी एकदा झालंच. काय करावं काही सुचेना.

एखादा दिवस उगाचच कंटाळा आल्यासारखं वाटतं. माझ्या बाबतीत मी फारस असे होऊ देत नाही पण तरी एकदा झालंच. काय करावं काही सुचेना.

ग्रुप मधल्या काही मित्रांना भेटूया म्हटलं तर भाव खातील असे वाटले. मग त्यातल्या तिघांना ज्यांना भेटून बरेच दिवस झाले होते त्यांना शंभर शंभर रुपये ट्रान्सफर केले आणि narration मध्ये तिकीट असे लिहिले. अर्थात हे वेगळे सांगायला नको की आजच्या ॲप च्या जमान्यात हे फार सोपे झाले आहे. पुढची ३०-४० मिनिटं शांततेत गेली.

सर्वप्रथम एका मैत्रिणीचा फोन आला. समजतोस काय स्वतःला कधीकाळी मी तिकिटाचे पैसे दिले ते तू आज असे परत करतोस का?

यावर मी काही उत्तर देणार तर ती बोलतच सुटली. अरे फायनान्स मधला आहेस तर मग सगळ्याचा हिशोब ठेवला पाहिजेस तू.

झालं बोलून तुझं, आता माझ ऐक. खूप दिवस झाले होते बोलून म्हणून उगीच पाठवले होते, त्यानिमित्ताने बोलणं झालं ना? आणि काय ग कोणत्या चित्रपटाचे पैसे दिले होतेस तू?

मला काय माहिती, मला वाटलं तू ‘तिकीट ‘ लिहिलं म्हणून मी ओरडले तुला. म्हणालो छान आहे, भेट आता कधी कॉफी ला. नक्की भेटूया पुढच्या आठवड्यात असे म्हणाली .

इतक्यात व्हाट्सअप वर नोटिफिकेशन आले. एका मित्राने यथेच्छ शिव्या दिल्या होत्या. कधीकाळी मॉलमध्ये तुझ्या पार्किंगच्या तिकिटाचे पैसे दिले ते तू असे परत केल्याबद्दल या शिव्या देत आहे. मैत्रिणीला म्हणालो चल नंतर बोलू या. मित्राला फोन केला. काय राजे कशाला चिडताय आमच्यावर? अरे समजतोस काय तू स्वतःला शंभर रुपये काय परत करतोस रे?
मित्रा त्यानिमित्ताने आज किती दिवसांनी तरी आपलं बोलणं झालं.

अरे तसं नाही २०० रुपये दिलेले मी तिकिटाचे…मग ह्यावर मात्र आम्ही दोघे यथेच्छ हसलो. तेही लवकरच भेटायचं ठरवून.

रात्री बेवड्या मित्राचा कॉल आला, अरे लोकांना १००- १०० रुपये वाटतो आहेस असे कानावर आले, मग आम्हाला का नाही? त्याला म्हणालो senti मारू नकोस. उद्या चहा ला भेटूया आणि १०० रुपयाचा चहा मारू. मग तर झालं? समोरून लगेच होकार आला.

रात्री सर्व मित्रांना माफीचा संदेश पाठवला आणि म्हणालो सहज , अगदी गंमत म्हणून पाठवले पैसे. रागवू नये.

मैत्रिणी सकट सर्वांनी त्या मेसेज चा reply शिव्यांनी केला. पण माझा दिवस अगदी छान गेला.

ॲप मध्ये जाऊन scratch card उघडले. तीनही ठिकाणी better luck next time आले. आणि ते खरं पण होतं, येणाऱ्या आठवड्यात तिघे जण प्रत्यक्ष भेटणार होते.