Categories
Reviews

कलाकारांच्या विश्वात

सध्या OTT प्लॅटफॉर्म खूप डिमांडमध्ये आहे. कुठलंही खिसेकापू तिकीट नाही, कुठल्याही सेन्सॉरची गरज नाही आणि एकदा मेंबरशिप घेतली की विषय एन्ड. म्हणजेच कमी किंमतीत जास्त आनंद!

OTT म्हणजे OVER THE TOP, ह्या नावातच सगळं काही आहे, नाही का? तडक, भडक आणि काँटेंट कडक — हे OTT प्लॅटफॉर्मचं सूत्र जगभरात सगळ्यांना जबरदस्त भावलं आहे. सध्या OTT प्लॅटफॉर्म खूप डिमांडमध्ये आहे. कुठलंही खिसेकापू तिकीट नाही, कुठल्याही सेन्सॉरची गरज नाही आणि एकदा मेंबरशिप घेतली की विषय एन्ड. म्हणजेच कमी किंमतीत जास्त आनंद! 

तुम्ही म्हणणार की OTT चा गजर का चालू आहे? आता तिकडेही  काही वेगळेपणा राहिला नाही. त्याच बोरिंग स्टोरीज असतात, क्राईम किंवा साय-फाय. बऱ्याच जणांचं तर आता असं मत झालंय की खून, चोऱ्या आणि लव्हस्टोरी म्हणजे वेबसिरीज. त्या पलीकडे काही नाही आणि खूप स्कोप असतानासुद्धा OTTवर चांगल्या कथा दाखवत नाहीत.

आणि कुठेही करमणूकीशी तडजोड नाही. सॉलिड कंटेंट, सॉलिड एंटरटेंमेंट. 

थांबा, जरा थांबा! कारण काय आहे, आपल्याकडे दोन भन्नाट कथांवर वेबसिरीजची निर्मिती झाली आहे. ‘मसाबा मसाबा’ आणि ‘बंदिश बॅंडित’.  या दोन्ही सिरीजची खासियत म्हणजे कलाकार आणि त्यांचं विश्व! 

“Creativity is not a tap naa.. jab kholo paani behna shuru”.  हा डायलॉग नेटफ्लिक्सच्या ‘मसाबा मसाबा’ वेबसिरीजमध्ये आहे. कला ही पाण्याच्या नळासारखी नाही, नळ सोडला की ती पाण्यासारखी वाहील, असं मसाबा म्हणते. मसाबा एक फॅशन डिझायनर आहे. तिची दुसरी ओळख म्हणजे नीना गुप्ता या अभिनेत्रीची ती मुलगी. लेखकानं मसाबाच्या फॅशन वर्ल्डची गोष्ट सांगितली आहे आणि तिचं आईसोबत असलेलं वेगळं नातं दाखवलं आहे. आई नाराज असेल तर मसाबा तिला चिअर अप करते. कधी कधी तिच्याशी भांडते. एवढचं काय आईसाठी प्रीमियर पार्टी प्लॅन करते. कोड्यात सापडली की ती तिच्या याच  मैत्रिणीकडे धाव घेते. पण काही वेळेस ती इतकी कामात गुंतून जाते की याच मैत्रिणीचा तिला विसर पडतो. 

सर्वसामान्य माणसांसारखी मसाबाही कामाच्या गडबडीत क्षुल्लक चुकासुद्धा करते. परिस्थितीसमोर हारते पण त्याच्यावर तोडगाही काढते. पहिल्याच एपिसोडमध्ये ती नवऱ्यासोबत डिवोर्स घेताना दिसते. काही गोष्टींतून तिला जाणवतं की स्वत:ची स्पेस असायला पाहिजे. ती एकटीच स्वतंत्र घरात राहू लागते. हळूहळू तिच्या डिझायनिंगमधून तिला प्रेरणा सापडते.

दुसरी वेबसिरीज म्हणजे ‘बंदिश बँडित’. इथे शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या राधेची गोष्ट आहे तसेच शास्त्रीय आणि पाश्चात्य संगीत पद्धतींमधील फरक बघायला मिळतो. दोन्ही संस्कृती आपापल्या जागी बरोबर आहेत, असं लेखकाला सांगायचं आहे. 

कथानक संगीतविश्वाच्या पलीकडे जात नाही. जोधपुरमध्ये राहणाऱ्या राधेची ही कथा आहे. राधेच्या आजोबांच्या भूमिकेत नसिरुद्दीन शहा आहेत. ते त्याचे संगीत गुरुसुद्धा आहेत. त्यांचं मत आहे की राधेने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेऊन त्यांच्या संगीत घराण्याचं नाव उज्ज्वल करायला पाहिजे. गुरुजी राधेला एक गोष्ट शिकवतात की पहिल्या दहा सेकंदात रसिक प्रेक्षकांना होल्ड करायला जमलं पाहिजे! 

कडक शिस्तीचं संगीत शिक्षण घेताना राधेची आणि तम्मनाची ओळख होते. तम्मना मुंबईची एक रॉकस्टार असून वेस्टर्न म्युझिकचा गाडा ओढते आहे. तिच्या अल्बमसाठी हट्ट करून ती राधेला गायला सांगते. तो तयार होतो कारण त्याची आर्थिक गरज असते. मग शास्त्रीय आणि वेस्टर्न फ्युजन तयार होतं आणि त्यांची लव्ह स्टोरीही आकार घेऊन लागते. 

पण वेस्टर्न संगीत मोठी संधी देत असतानाही पारंपारिक गायन राधेला सोडवत नाही. जोधपुरमध्ये राजेशाही परंपरा आणि शास्त्रीय संगीताचे जाणकार अजूनही आहेत. इंडियन आयडॉलसारखी संगीत सम्राट स्पर्धा तिथे आयोजित केली जाते. या स्पर्धेसाठी राधे गायनाची तयारी सुरु करतो. तो यशस्वी होतो का?

दोन्ही सिरीजमध्ये कला आणि कलाकारांच्या अस्तित्वाची लढाई दाखवलेली आहे. कला जोपासताना प्रेम, कष्ट या दोघांचा ताळमेळ साधायला लागतो. स्वप्नांसाठी धडपड करायला लागते. कधी एक प्रॉब्लेम सुटला तर दुसरा दार ठोठावतो. काही वेळेस उपाय असतो, काही वेळेस असहाय्य वाटते. प्रोफेशनल लाईफ जपताना कलाकारांना कधी कधी पर्सनल लाईफमध्ये समस्यांना तोंड द्यावं लागतं. काही वेळेस ठाम रहावं लागतं, तर काही वेळेस क्षुल्लक चुका घडतात. आणि हे सगळं करताना कलेशी प्रामाणिक राहायचं असतं. 

स्टारडम दिसायला बाहेरून रंगीत दिसतं, पण जो अनुभव घेतो त्याला त्याचं खरं रूप कळतं. 

हे झालं वेबसिरीजच्या कथांबद्दल. आता कलाकारांविषयी. सगळ्यांनी जीव ओतून काम केलं आहे. प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक चमकले आहेत. ते जणू स्वत:ची कथा आणि व्यथा तुमच्या समोर सादर करीत आहेत. कास्टिंग खूप चांगलं झालं आहे.

आणि कुठेही करमणूकीशी तडजोड नाही. सॉलिड कंटेंट, सॉलिड एंटरटेंमेंट. 

मग आता वाट कसली बघताय? कला आणि कलाकाराला जवळून भेटायचं असेल तर ह्या दोन सिरिज नक्की बघा! 

Happy viewing!