Categories
Kavadse

बच्चन

कधीही साधे हॅलो पण न करणारे खालच्या मजल्यावरचे अशोक काका दारात उभे होते. तुमच्याकडे उंच लाकडी स्टूल आहे ते हवे होते, ट्यूब बदलायची होती. मी बाल्कनीत गेलो तर आमचा ‘बच्चन’ गायब.

दाराची सकाळी सकाळी बेल वाजली. कधीही साधे हॅलो पण न करणारे खालच्या मजल्यावरचे अशोक काका दारात उभे होते. तुमच्याकडे उंच लाकडी स्टूल आहे ते हवे होते, ट्यूब बदलायची होती. मी बाल्कनीत गेलो तर आमचा ‘बच्चन’ गायब. आई ला विचारले तर ती म्हणाली मागल्या आठवड्यात ‘रेखा’ काकू पंखे पुसायला घेऊन गेल्यात. अशोक काकांना थोड्या वेळात आणून देतो असे म्हणून दरवाजा बंद केला. दिवाळी च्या आधी तर आमचा बच्चन अगदी फॉर्मात यायचा. एरवी ओळख दाखवायला पण कचरणारे, नातेवाईक असल्यासारखे ते उंच स्टूल हक्क्काने घेऊन जायचे.

त्याच्या जन्माची कथा पण तितकीच रोचक आहे. म्हणजे आमचा जुना वाडा उतरवला तेव्हा त्यातला एक लाकडी वासा त्याची आठवण म्हणून बाबांनी घरात आणून ठेवला. त्यावरून पुढे अनेक वर्ष आई आणि बाबांची जुंपायची. एके दिवस तो अचानक गायब झाला. त्यावरून आई बाबा परत भांडले. तर झाले असे होते कि बाबांनी त्याचे ते उंच स्टूल बनवून घेतले. त्याच्या उंची मुळे आम्ही त्याला बच्चन म्हणत असू. पुढे बच्चन ला कुठे उभे करायचे ह्यावरून आई आणि बाबा भांडायचे आणि लग्नानंतर मी आणि माझी बायको भांडत बसतो.

जगात म्हणजे पुण्यात खूप कमी घरात हे बच्चन स्टूल असते आणि जास्तीत जास्त वेळा शेजार पाजाऱ्यांना त्याचा उपयोग होत असतो.

मित्रांमध्ये पण काही मित्र असेच असतात पार्ट्यांना, मुव्हीस ला, ट्रिप ला त्यांची आठवण येत नाही पण अडीअडचणीला मात्र त्यांचीच आठवण होते. कारण मदतीला हाक मारली तर त्यांचा फोन कधीही busy नसतो. नकळतपणे एखाद्या मित्राला आपण स्टूला सारखे वागवत असतो किंवा आपण कोणाचे तरी स्टूल झालेले असतो.

मी फोन हातात घेऊन माझ्या स्टूलाला कॉल केला. समोरून आवाज आला, काय रे काय झालं? कुठे यायचंय? मी म्हणालो काहीच नाही झालं, रविवारी बायको पोरांना घेऊन जेवायला ये म्हणजे तुझा बच्चन होणार नाही.