Categories
Lockdown Diaries

बोलके कट्टे झाले शांत..

तरीही एकत्र जमणाऱ्या मित्रांचे कट्टे काही ओस पडले नाहीत, उलट त्यांची जास्त गरज जाणवू लागली. एकमेकांना भेटायची ओढ आणि जागा या विविध कट्ट्यांची जननी होती.

पुण्यातली गप्पिष्ट मित्रमंडळी कट्ट्यांवर जायचंय 

एकेकाळी, पुणं म्हणजे शांत निवासाचं ठिकाण समजलं जात असे. लोकं निवांत होते, धावपळ नव्हती की कसलीही गर्दी नव्हती. आयटी कंपन्या नव्हत्या. 

मात्र तेव्हाही सांस्कृतिक पुणे जागृत होतं. कला, साहित्य यांच्या भरभराटीसह पुण्यातल्या खाद्यसंस्कृतीचीही वाढ होत होती. 

मार्च २०२० मध्ये सर्व सुरळीत, आनंदात  चालू असताना अचानक कोरोनाची लाट आली आणि सर्व ठप्प झालं.

तेव्हा हॉटेल्स संख्येने थोडीशीच होती पण तिथल्या आवडत्या पदार्थांच्या ओढीमुळे मित्रमंडळी एकत्र जमायची आणि अर्थातच जमल्यावर विविध विषयांवर गप्पा व्हायच्या. या गप्पिष्ट लोकांचे शहरात अनेक कट्टे तयार झाले. त्यांना कट्ट्यावर वेळ कसा निघून जायचा ते कळायचं नाही.

कट्ट्यांची सुरुवात जरी हॉटेल्समधून झाली असली तरी हळूहळू विविध टेकड्या, हास्य क्लब, बगीचे, स्पोर्ट्स क्लब, ग्रंथालये, मंदिरे अशा ठिकाणीही हे कट्टे दिसायला लागले. महत्वाचं म्हणजे तरुणांपेक्षा जेष्ठांसाठी असे कट्टे म्हणजे जणू आनंदाचा मेळावाच असे. 

फर्ग्युसन रोडवरील वैशाली, रुपाली, डेक्कन कॉर्नरवरचं गुडलक कॅफे आत्ताआत्तापर्यंत अशा ग्रुप्सने वेढलेले दिसत. जेष्ठांपासून ते शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत, ऑफिसमधल्या ग्रुप्सपासून ते महिलांच्या ग्रुप्सपर्यंत सर्वच या कट्ट्यांवर बघायला मिळत. केवळ फर्ग्युसन रोडच नव्हे त्र मंडळ, सिंहगड रोड, पेठा, लॉन कॉलेज रोड अशा पुण्यातल्या बहुतांश ठिकाणी असे कट्टे आपण पाहिले असतील. 

आयटी कंपन्या आल्यावर काही काळाने पुण्यात गजबजाट वाढू लागला, वाहनांची गर्दी झाली, कामांच्या वेळा बदलल्या. तरीही एकत्र जमणाऱ्या मित्रांचे कट्टे काही ओस पडले नाहीत, उलट त्यांची जास्त गरज जाणवू लागली. एकमेकांना भेटायची ओढ आणि जागा या विविध कट्ट्यांची जननी होती. एखादं भेटीचं ठिकाण ठरवायचं, एकत्र भेटायचं आणि एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारायच्या. मग या गप्पा अगदी खेळांपासून ते राजकारणापर्यंत रंगत असत. या मित्रमंडळींच्या गटातली खासियत म्हणजे यात एखादाजण खूप माहिती सांगणारा असे तर एखादा  शांतपणे ऐकून घेणारा; कोणी बोलण्याच्या नादात जास्तीच्या थापा मारणारा तर कोणी मध्येच अडवून खोड काढणारा.

मार्च २०२० मध्ये सर्व सुरळीत, आनंदात  चालू असताना अचानक कोरोनाची लाट आली आणि सर्व ठप्प झालं. लोकांचं घराबाहेर निघणंच बंद झालं. ऑफिसमधली कामं घरून होऊ लागली. बाहेर जाण्याची बंदी आणि आरोग्याची काळजी यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण घरात अडकून पडले. वाईट म्हणजे त्यामुळे मित्र-सवंगड्याना जोडणारी गप्पाष्कं आणि ते कट्टेही बंद पडले आणि सोबतच कट्ट्यांवरच्या चर्चा सुद्धा.

इकडे शाळा-कॉलेजमधल्या मुलांना ऑनलाईन क्लास, ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, गृहिणींची वाढलेली कामं यामुळे घरातल्या बाकीच्यांचा वेळ जरी जात असला तरी पेन्शनर्स, ज्येष्ठ मंडळी यांच्याकडे उरल्या होत्या फक्त जुन्या कट्ट्यांवरच्या आठवणी. 

मग सुरु झाली आठवणीतल्या मित्रांना फोनाफानी आणि  इंटरनेटच्या सहाय्य्याने व्हिडीओ कॉल्सवर गप्पा. पण शेवटी या सुविधांनाही मर्यादा असतात आणि प्रत्यक्ष भेटीच्या तुलनेत अशा व्हिडीओ कॉल्समध्ये तो आनंद, ती भेटण्याची ओढ आणि समाधान मिळतच नाही मुळी. एखाद्या कट्ट्यावर रोज रोज भेटूनही कंटाळा येत नाही, तोच एखाद्या कॉलवर रोज रोज काय बोलायचे असा प्रश्न पडायला लागतो. 

असो. कोरोना काळात सर्वांच्याच राहणीमानात, रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक बदल झाले आहेत. तरीही जुन्या आठवणींची आणि भेटींची कमतरता आज कुठे ना कुठे जाणवते आहे. बदललेल्या परिस्थितीशी आपण सर्वांनीच जुळवून घेतलं असलं तरी मनामध्ये सर्वजण एक आशेची उमेद घेऊन जगताहेत की लवकरच हा काळही जाईल आणि पुन्हा एकदा नव्याने गप्पाष्टक कट्ट्यांना रंगत येईल. पुन्हा एकदा रंगतील मित्रांसोबतच्या मैफिली आणि पुन्हा एकदा लुटता येईल मनसोक्त जगण्याचा आनंद…