Categories
Kavadse

छप्पर

ज्या दिवशी छपराचा शोध लागला त्या दिवशी चार भिंतींना एक वेगळीच व्याख्या मिळाली, घर नावाची.

ज्या दिवशी छपराचा शोध लागला त्या दिवशी चार भिंतींना एक वेगळीच व्याख्या मिळाली, घर नावाची. कोणा एका वेड्याने चार फांद्या तोडून त्यावर पानाचं छप्पर टाकून दिलं , माणसाला खरंतर त्यानेंच गुहेतून बाहेर काढलं असावं.

काय कमाल वाटलं असेल ना, छप्पर आणि त्या खाली तयार झालेले घर. पण कदाचित ह्या घरामुळे माणूस निसर्गापासून अजूनच दूर गेला. अगदी पाऊस आणि वाऱ्यापासून पण दूर गेला. नंतर छोटी झोपडी किंवा तंबू बांधता बांधता एक शर्यतच चालू झाली आणि डोक्यावर फॉल्स सिलिंग आल्यावर ती आता थांबली आहे.

निसर्गापासून दूर जातांना घरातलं फर्निचर मात्र लाकडी बनते आहे, निसर्गाचे वॉल पेपर्स पण आहेत. मोठ्या घरांमध्ये तर आत झाडं पण आहेत. इतकं सगळं करूनही खरं मोठं घर कोणाचं? त्या ज्ञानेश्वर माऊलीचे, ज्यांनी विश्वची माझे घर म्हणून ह्या जगाला आपले समजले किंवा गावोगावी फिरणाऱ्या डोंबार्याचे.

जुन च्या महिन्यात जेव्हा पाऊस येतो, आपल्यातला निसर्ग पुन्हा एकदा जागा होऊन जातो. जवळच कुठेतरी पत्र्याच्या छपरावर पडतांना पाऊस जणू झाकीर भाई सारखा बेधुंद होऊन तबला वाजवत असतो. शरीर कितीही निगरगट्ट वागलं तरी त्या तालावर मन मात्रं बेधुंद होऊन नाचते. काही काळ का होईना आपल्यातला डोंबारी बाहेर आल्याचा भास होतो. डोक्यावरचं छप्पर सांभाळत खेळ मांडणारा एक डोंबारी.