Categories
Heritage

सण विजयपर्वाचा

पौराणिक कथांमधील विजय ते पेरणीच्या उत्सवाचे साजरीकरण — दसऱ्याचे विविध पैलू.

पौराणिक कथांमधील विजय ते पेरणीच्या उत्सवाचे साजरीकरण — दसऱ्याचे विविध पैलू

दसरा म्हणजे  घरातील नवरात्राचे उत्थापन, संध्याकाळी एखाद्या मैदानात किंवा विशिष्ट जागी रावणाच्या प्रतिमेचे  दहन आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन आपट्याची पानं भेट करणं. महाराष्ट्रात दरवर्षी अशाच पद्धतीने दसरा साजरा करण्यात येतो. यावर्षी मात्र कोरोनामुळे ना रावण दहन ना आप्तमित्रांच्या गाठीभेटी. तरीही घराघरांतून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातील, सोनं खरेदी करून पूजेत ठेवलं जाईल, गोडधोड केलं जाईल, सरस्वती आणि शस्त्र पूजनही केलं जाईल. 

नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर येणारा हा सण वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींनी मिळविलेल्या विजयाचे प्रतिक आहे. पण त्याव्यतिरिक्त या दिवसाला विविध कथा, परंपराचे अनेक पैलूदेखील आहेत.

बळीराजाचा आनंदोत्सव 

आपल्या शेतकरी बंधुंसाठी हा दिवस मोलाचा असतो. नवरात्रीच्या सुरवातीला म्हणजे घटस्थापनेला घरोघरी धान्य पेरून घट उभारायची जी प्रथा आहे त्याचं मूळ कारण म्हणजे पावसाळयात पेरलेलं पहिलं पीक घरात आलं की शेतकरी हा उत्सव साजरा करतात. घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करून मग दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर देवाला अर्पण केले जातात.

नवरात्र आणि दसरा 

पौराणिक कथेनुसार यादिवशी रामाने सीतेला वाचवण्यासाठी रावणाचा वध केला होता. याकरिता रामाने दुर्गा देवीची मनोभावे पूजा केली. अखेर देवीने प्रसन्न होऊन रामाला असे शस्त्र दिले ज्यामुळे रावणाचा वध करणे शक्य झाले. त्याचे प्रतिक म्हणून यादिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. 

शस्त्रपूजेचे महत्व

शस्त्रपूजेची अजून एक कथा पांडवांविषयीची आहे. कौरवांसह द्युतात हरल्यानंतर पांडवांना १२ वर्षांसाठी वनवासात आणि १ वर्षासाठी अज्ञातवासात जावे लागणार होते. त्यापूर्वी त्यांनी आपली सारी शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवली. अज्ञातवास संपल्यानंतर पांडवानी कौरवांविरुद्ध युद्धाची घोषणा केली आणि ते युद्ध जिंकले. त्यादिवसापासून बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा करण्यात येते. आज अनेक घरी दसऱ्याच्या दिवशी वाहनं, पुस्तकं, स्वयंपाकघरातल्या काही गोष्टींची पूजा करण्यात येते. कारण बदललेल्या काळात या गोष्टीच आपल्या जीवनात शस्त्र म्हणून काम करतात.

राक्षसाचा वध

आणखी एका कथेनुसार महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रह्मा-विष्णू-महेश या तिघांनी एकत्रितपणे आपल्या शक्तीने देवी दुर्गेला उत्पन्न केले. दुर्गेने विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी महिषासूराचा वध केला.

राज्याराज्यातील प्रथा 

महाराष्ट्रात रावण दहन करून, आपट्याची पानं भेट देऊन दसरा साजरा केला जातो त्याप्रमाणे भारतात विविध ठिकाणी या सणाविषयीच्या विविध प्रथा आहेत. म्हैसूरमध्ये या काळात चामुंडा देवीची पूजा करून मग आनंदोत्सव साजरा केला जातो. तसेच गेल्या ६०० वर्षापासून तिथे दसऱ्याच्या दिवशी जत्राही भरवली जाते. राजस्थान येथील सिकर जिल्ह्यात रावण दहन न करता राम आणि रावण असे दोन गट करून त्यांच्यात युद्ध खेळले जाते. कुल्लूमध्ये दसऱ्याला भगवान रघुनाथाची रथयात्रा निघते. 

शिवकालीन आणि पेशवेकालीन परंपरा

दसऱ्याला ‘सीमोल्लंघन’ दिवस म्हणूनही ओळखले जाते. आपल्या ठिकाणच्या सीमारेषेची वेस ओलांडून जाणे म्हणजे सीमेचे उल्लंघन करणे.

शिवकालीन आणि पेशवेकालीन परंपरेत या दिवसाला विशेष महत्व होते. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला तसेच पेशवाईतसुद्धा या सणाला महत्व होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत नक्की करत असत. 

दसरा या सणाला जरी अनेक कथा आणि प्रथांच्या विविधरंगी छटा असल्या तरीही या दिवसाचे महत्व म्हणजे ‘नव्या उर्जेने करण्यात येणारी सुरवात’. अशा या मंगलमयी विजायदशमिला प्रत्येकाच्या ह्रद्यातील सत्याचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा विजय होवो.