Categories
Your voice

जेव्हा शेतकऱ्यांनी दाखवला होता ताकतीचा हिसका…

गांधीनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेऊन नीळ लागवडी विरुद्ध चंपारण्य चळवळ सुरु केली. अश्या प्रकारे छोटया ठिणगीचं आगीत झालेल्या रूपांतरामुळे नीळ उत्पादन कायमचं थांबल्या गेलं.

…तेव्हा इंग्रजांनी सुद्धा समोर गुडघे टेकले होते !

इंग्रजांच्या तावडीतून सुटून स्वातंत्र्य मिळवून स्वतंत्र होण्यासाठी भारताने खडतर संघर्ष केला. अनेक चळवळीतून केलेले शर्थीचे प्रयत्न पूर्णत्वास नेले. इंग्रजांना मेटाकुटीस आणुन देश सोडण्यास भाग पाडण्यात आलं. विद्रोहाचं अकल्पित रूप भारतीयांचं त्यावेळी पाहण्यात आलं होतं. ज्यात शेतकऱ्यांनी केलेला ‘नीळ बंड’ हा आजही स्वातंत्र्याच्या दिशेनं टाकलेल्या महत्वाच्या पाऊलांमधील एक म्हणून पाहिला जातो. 

आज सद्यस्थितीला अन्याय होत असले तर शेतकरी आक्रमकता घेत नाही असं आपल्याला वाटायला नको, म्हणून ‘ ब्रिटीश सरकारला ‘ गुडघे टेकायला लावणाऱ्या शेकऱ्यांच्या नीळ बंडाची सगळी पार्श्वभूमी आपण जाणुन घेऊयात. कारण अन्यायाला फक्त न्यायाचा पर्याय असतो.  मग तो शांतीने असो किंवा बंडाने. 

ब्रिटीश भारतात आले, ते व्यापारातून वसाहतवादाला चालना दयायला.  इथल्या शेतकरी वर्गाला विविध प्रकराची शेती करायला लावून उत्पन्न काढायचं आणि इग्लंडला घेऊन जायचं हे त्यांचं प्रमुख उदिष्ट होतं. सहमतीने नाही जमलं म्हणून सक्तीने भारतीय शेतकरयांना युरोपीय शेती करण्यास ब्रिटीश भाग पाडू लागले. अठराव्या शतकाच्या शेवटी ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने अफू आणि नीळ लागवडीवर जास्त भर देण्यास सुरुवात केली. नीळ त्यांच्यासाठी महत्वाचं उत्पन्न होतं, कारण निळीचा ब्रिटन मध्ये छपाई करण्यासाठी वापर केला जात होता. 

जशी ब्रिटन मधून भारतीय निळीची मागणी वाढली, तशी ईस्ट इंडिया कंपनीने ठोस पावलं उचलायला सुरुवात केली.  जिथून इंग्रजांनी भारतात प्रवेश केला त्या बंगालपासूनचं त्यांनी नीळ लागवड सुरु केली. जी बिहार पर्यंत जाऊन पोहचली. त्याकाळी जागतिक बाजारपेठेत भारतीयांची ‘ निळगीरी ‘  होती, असं म्हणायला हरकत नाही. कारण बंगालच्या निळीला जगात तोड नव्हती.  

शेतकऱ्याला नीळ लागवडीत काहीच नफा निघत नव्हता. उलट घर जाळून कोळश्याचा धंदा होत होता.

१७८८ सालापर्यंत ब्रिटन ( इंग्लंड ) कडून आयात केली जाणाऱ्या एकूण जागतिक निळी मध्ये  भारतीय निळीचा वाटा फक्त ३० % एवढाच होता. जो पुढे १८१० सालाच्या आसपास ९५ % पर्यंत जाऊन पोहचला. ब्रिटीशांना नीळ लागवडीच्या शेतीसाठी शेतकरी वर्गा सोबत मजूरांचीही गरज होती. अश्या परिस्थितीत त्यांनी दोन मार्गांनी नीळ लागवड करण्यास सुरुवात केली. त्यात प्रथमता मुकादमाला सगळी जवाबदारी देऊन नीळ शेती करायला लावायची. ज्यामध्ये शेतकऱ्याला जबरदस्तीने जमीन भाडे तत्वावर द्यायची होती. 

त्याचं भाडोतरी मूल्य खूप कमी असायचं. दुसरीकडे मुकादम सहमती दर्शवलेल्या शेतकऱ्यासोबत करार करून नीळ उत्पादन घेण्यासाठी कमी व्याजदराने कंपनी कडून रोख कर्ज मिळवून द्यायचे.  सगळं शेतकऱ्यालाच बघावं लागायचं. त्यात भात लागवड आणि नीळ लागवड सोबत असल्याने खूप नुकसान ही व्हायचं. नुकसान भरपाई देण्यास मात्र ब्रिटीश असमर्थ असायचे. त्यात एकदा नीळ लागवड केलेल्या शेतीवर पुन्हा काही उत्पन्न घेता येत नव्हतं. असचं नीळ चक्र सतत चालू राहू लागलं. शेतकऱ्याला नीळ उत्पादन घेण्यासाठी मारहाण सुद्धा होऊ लागली. शेतकरी कायम कर्जात राहू लागला. आणि शेतकऱ्यांचा जीव सक्तीचं दृदैव्वी जीवन जगू लागला. 

शेतकऱ्याला नीळ लागवडीत काहीच नफा निघत नव्हता. उलट घर जाळून कोळश्याचा धंदा होत होता. अश्यात नीळ लागवडी मुळे जमिनीचा ऱ्हास, मनाविरुद्ध शेती आणि जगण्याच्या समस्या प्रचंड प्रमाणात उद्भवायला लागल्या. ज्यात अनेक शेतकऱ्याचं जीवन उध्वस्त झालं. जीवनाच्या परिस्थितीला लागलेली आग विद्रोहाची आग बनली. आणि शेवटी सगळ्या गोष्टीला कंटाळून तोंड देण्यासाठी, त्याचं आगीतून बंगालच्या शेतकऱ्यांनी इग्रजांच्या विरोधात नीळ बंद क्रांतिकारी आंदोलन पेटवलं. १८५९ मध्ये हजारो बंगलाच्या शेतकरी वर्गाने नीळ लागवड करण्यास नकार दिला. 

बंडखोरीची पहिल्यांदा सुरुवात कुठे झाली?

अन्यायाच्या विरोधात संघर्ष करून न्यायाची वाट शोधण्यासाठी बंगालच्या नादिया जिल्ह्यातील गोविंदपूर गावात सप्टेंबर १८५८ मध्ये नीळ बंड आंदोलनाची सुरुवात झाली. ज्याचं नेतृत्व तेथील स्थानिक नेते दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास यांनी केले होतं.

१८६० पर्यंत हे बंड मालदा, ढाका, पवाना, अश्या बंगालच्या बऱ्याच भागात पोहचलं. या बंडामुळे ब्रिटीशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. शेकऱ्यांच्या एकजुटीने बंडाला बळकटी मिळाली. मुकादमाला जमीन भाड्याने देणं तेव्हापासून थांबल्या गेलं. शेतकरी इथपर्यंतच नाही थांबला. तर शेतात वापरलेली नीळ उत्पादनाची शस्रे कारखान्यावर हल्ला करण्यास वापरू लागला. फक्त पुरुष शेतकऱ्यांनीचं नाहीतर महिलांनी सुद्धा यात सहभाग घेतला होता. 

१८५७ ला झालेल्या उठावामुळे ब्रिटीश फार जागरूक झाले होते. त्यांना शेतकरी वर्गाने पुकारलेल्या नीळ बंद बंडाची फार अस्वस्थ भीती वाटू लागली होती. त्यांना काहीही करून बंड शांत करून साम्राज्य व्यापारवाढ कायम ठेवायचा होता. त्यामुळे त्यांनी काही ठोस निर्णय घेतले. काहीश्या प्रमाणात शेतकऱ्याच्या बाजूने घेतले. पण तोपर्यंत आंदोलन फार चिघळले होते. ते महात्मा गांधीपर्यंत जाऊन पोहचलं. 

गांधीनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेऊन नीळ लागवडी विरुद्ध चंपारण्य चळवळ सुरु केली. अश्या प्रकारे छोटया ठिणगीचं आगीत झालेल्या रूपांतरामुळे नीळ उत्पादन कायमचं थांबल्या गेलं.

या काळात इंग्रजांनी शेतकऱ्यांच्या या नीळ बंड क्रांतीकरी आंदोलना समोर अक्षरशा गुडघे टेकले होते.