Categories
Your voice

मानसिक अस्वस्थ ग्रस्त महिलांची अविरत सेवा

पण विवेकबुद्धीला जेव्हा खरी चालना मिळाली तेव्हापासून आजपर्यंत अहमदनगरमधील एक डॉ दांपत्य निराधारांच्या मदतीला माणसातला “ देव “ बनून धावुन जात आहे.

आज समाजाच्या सेवेत लीन होऊन तल्लीन झालेली मंडळी क्वचितच निदर्शनास येतील. कारण किळस आणि घृणा यांच्यापासून ज्याला त्याला पळ काढायचा असतो. पण विवेकबुद्धीला जेव्हा खरी चालना मिळाली तेव्हापासून आजपर्यंत अहमदनगरमधील एक डॉ दांपत्य निराधारांच्या मदतीला माणसातला “ देव “  बनून धावुन जात आहे. आज त्यांचीच काट्यांच्या वाट्यावरची समाजाच्या सेवेची संघर्षमय यशोगाथा जाणून घेणार आहोत. 

माणूस उपरा झाला ना की त्याला कोणताच कोपरा धार्जीन होत नाही. हातवरचं पोट भरायची सुद्धा ताकत राहत नाही. काही याला कंटाळून जगाला सोडून जातात तर काही मानसिक स्वास्थ्य ढासळून बसतात. मग जगण्याची खूप तारांबळ उडती. समाज बरा बघत नाही. पोटाला भाकर पुरवत नाही. मग नाल्यात जाऊन उष्ट अन्न शोधत बसावं लागतं. आणि शेवटी तेच खाऊन जगावं लागतं. किती वाईट नशीब अश्या लोकांच्या कपाळावर लिहून येतं, याची थोडी जरी कल्पना केली, तर तोंडात घास नीट जात नाही. अशी लोकं कुडं दिसले की बऱ्यापैकी माणसं अंतर ठेवून कलटी मारतात. पण सगळी माणसं सारखी नसतात. काहींच्या मनात त्यांच्या विषयी दया येते. प्रेम जागं होतं. जे उपरे हायतं त्यांना आपुन आपल्या घराचा कोपरा देऊन जगवू असा मनात विचार येतो. आणि त्यांच्यातल्या समाजसेवकाची खऱ्या अर्थाने सुरुवात तिथं होते. 

एक दिवस आसच मी आणि बायको रस्त्याने चाललो होतो, तव्हा एक महिला नाल्यात घाण पाण्यात उष्ट अन्न, कचरा असं काहीही खात होती. हे जव्हा माह्या डोळ्यानं पाहिलं तव्हा बायकोला म्हणलं हे बघवत नाहीगं. आतून खूप त्रास होतोय की यावर कुणी कसं पुढाकार घेत नाही. तव्हा बायको म्हणली, अहो मलाही खरच काय बोलावं कळत नाही. आपुन काही तरी करायचं का? बायकोच्या वाक्याने ठरवलं की आता इथून पुढं अश्या सगळ्यांची सेवा करायची, आधार दयायचा ज्यांना कुणाचाच आधार नाय. अश्या समाजधारी विचारांचा तव्हा सुरु झालेल्या दोन्हीही डॉक्टर नवरा बायकोचा निराधारांच्या सेवेच्या अविरत प्रयत्नाला आज २० वर्षं उलटून गेलेत. त्या समाजसेवी जोडप्याचं नाव आहे, डॉक्टर राजेंद्र धामणे आणि सुचीता धामणे. 

अहमदनगर मनमाड रोडवर शिंगवे या गावात निराधारांना आधार देत त्यांच्यासोबत जीवन जगणाऱ्या या दोन्ही नवरा बायकोचं मेडिकलचं शिक्षण सोबतच झालं. महाविद्यालयीन काळातच त्यांनी मनाशी ठरवलं होतं की आपण समाजसेवा करायची. जे ठरवलं ते कृतीतून त्यांनी आज सत्यात उतरवलं आहे. मेडिकल मधील डॉक्टरकीचं शिक्षण झाल्यानंतर राजेंद्र धामणे यांनी गावाजवळच एक दवाखाना चालू केला. आणि प्रक्टिस सरू केली. त्याचसोबत सुचीता धामणे यांनी एका मेडिकल कोलेजला शिकवायला सुरुवात केली. 

गावापासून अहमदनगर असा रोज प्रवास करताना कितीतरी निराधार अत्यंत नाजूक अवस्थेत दिसायचे. कुणीच त्यांच्याकडे पाहत नसायचं. काही गटारी नाल्यांमध्ये अन्न शोधत रोगाशी खेळायचे तर कुणी निर्वस्र भिरभिर फिरायचे. माणसं जवळ न येता लांब पळायची. राजेंद्र धामणे उघड्या डोळ्याने रोज पहायचे. डोळे अश्रुनी ओले व्हायचे. शेवटी हे पाहून त्यांचं हृद्य एकदाचं पिळवटून निघालं. काहीतरी करण्याचं धाडस मनात जन्माला आलं. त्यांनी बायकोच्या सोबतीनं आज कितीतरी निराधार मायबाप माउलीना आसरा देऊन आधारवड बनलेले आहेत. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.

आतून खूप त्रास होतोय की यावर कुणी कसं पुढाकार घेत नाही. तव्हा बायको म्हणली, अहो मलाही खरच काय बोलावं कळत नाही. आपुन काही तरी करायचं का ?

राजेंद्र धामणे यांनी या वीस वर्षांत खूप संघर्ष सोसला आहे. कारण चांगलं काही करायला लागलं की अनेकांना खपत नाही किंवा पटत नाही. त्यामुळे त्यांना अडवण्याचा ही खूप प्रयत्न अनेकांनी केला पण धामणे कुटूंब थांबलं नाही. त्यांनी जग कसं किती क्रूर वागतं हे स्वतः अनुभवलेलं आहे. 

आज आपण ज्यांच्या पोटी जन्म होऊन लहानाचं मोठं होतं. स्वतःच्या पायावर मोठं झाल्यावर आई वडील मात्र म्हातारे होऊ लागतात. तेव्हा त्यांना खरी आपली गरज असते. कारण त्यांनी आपल्याला लहानपणी मायेनं सांभाळलेलं असतं. तरीही वृद्ध मायबापाला घराबाहेर काढलं जातं. मानसिक स्वास्थ्य बिघडलं तर डॉक्टर कडे न जाता घरातून हाकलून ही दिलं जातं. काही महिलांचा ही यात समावेश असतो. यांच्यावर ह्या समाजातील भावनाखोर, हरामखोर, जनावरं इज्जतीशी खेळतात. म्हणजे सांगता येणार नाही अश्या परिस्थितीत पिडीत निराधार सापडतात. वीस वर्षांपासून दिसले निराधार की दिला आधार अशी मानवधर्मी सेवा करताना अनेक समाजउपयोगी खूप मोठं काम धामणे कुटूंब यांनी केलेलं आहे. 

या काळात त्यांना अनेक अडचणी आल्या. म्हणजे त्यांनी सुरुवातीला जे निराधार दिसले त्यांवर जेवण आणि उपचार करू लागले. पण अनेक निराधारांची समाजाच्या तुच्छ वागणुकीमुळे मानिसक स्वास्थ्य ठीक नव्हतं. त्यामुळे ते लांब पाळायचे. पण तरीही न खचता धामणे कुटुंबाने त्यांना विश्वासात घेऊन उपचार करून नीट करायला सुरुवात केली. मग नंतर ते स्वतःहुन निराधार शोधू लागले. अश्यातच त्यांनी विचार केला की असे आपण किती दिवस करणार ? तेव्हा त्यांनी गावात छोटया जागेवर दवाखाना चालू केला. तिथं निराधार रुग्णांची उपचार करून सेवा करू लागले. त्यात त्यांच्या जेवणाची ही सोय करू लागले. राहिलं होतं फक्त राहण्याची सोयीचं काम. तर आईवडिलांच्या मदतीने २००७ मध्ये त्यांनी शेल्टर होम सुरु केलं. जिथं आज अनेक निराधार गुण्यागोविंदाने जीवन जगत आहेत. ज्याचं नाव ठेवलं ‘ माउली प्रतिष्ठान ’. म्हणजेच आईच्या मायेचं द्वार.

एका निराधार महिलेला आधार दिल्यानंतरचा माउली प्रतिष्ठानचा प्रवास आज ३०० महिलांपर्यंत येऊन पोहचला आहे. जिथं आज त्या सुखी, समृद्ध जीवन जगत आहेत. त्यात काहींना पिडीत असल्याने दिवस जाऊन मुलेही झाली आहेत. तेही शिक्षणासोबत जीवनात रमत आहेत. एकूण ३० ते ४० मुले आज माउलीत आहेत. याचं काळात काहींचं निधनही झालं त्यांचं योग्य प्रकारे अंत्यसंस्कार सुद्धा माउलीने केलेलं आहे. शेवटी आईचं आहे नं ती. आई म्हणजेच मायेचं जग आहे. 

या माउली प्रतिष्ठानात ज्या निराधार महिला आहेत, त्यांच्यातल्या काहींवर मानसिक परिणाम झाल्यामुळे अंघोळी पासून ते जेवण आणि रात्री झोपायपर्यंत सगळी सेवा माउली करत आहे. ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. त्यात काही महिला पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत. ज्या माउलीत काम करून मदत करतात. 

सरकार कडून अजूनही फार काही ठोस मदत या माउली प्रतिष्ठानाला मिळालेली नाही. तरीही धामणे कुटूंब स्वतःच्या हिमतीवर निराधारांच्या सेवेची अविरत लढाई लढत आहे. हे पाहून खरच खूप अभिमान आणि प्रेरणादायी वाटत आहे. कारण समाजाच्या निराधार मायबाप माऊलींची सेवा करणं हे सध्याच्या काळात खूप गरजेचं आहे. जे देव करू शकत नाही ते आज धामणे कुटूंब करत आहे. म्हणजे त्या माउलीसाठी धामणे दांपत्यचं देवाच्या रुपात भेटलेले आहेत. या समाजसेवी डॉ धामणे दांपत्याला अभिमानास्पद सलाम.