Categories
Conversations

असं ही एक वेडिंग

लग्नाची तारीख ठरली. सगळे जय्यत तयारीला लागले. दागिने, बस्ता, मानपान — सगळ्याचा सपाटा सुरु होता. होणारी वधू चिंगी खूप खूष दिसत होती. पण तेवढ्यात कुठेतरी माशी शिंकली. कोरोना महामारीमुळे सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. सगळ्यांचा मूड ऑफ. चिंगीची स्वप्नं पूर्ण होणार की नाही? आता करायचं काय? 

चिंगीने पुढाकार घेतला आणि थेट मुलाशी बोलली. सगळं काही नॉर्मल होण्यासाठी बराच काळ जाणार होता. नवऱ्या मुलाला पटलं. काही दिवस वाट बघू, असं सर्वांमते ठरलं. 

दरम्यान सरकारनं फर्मान काढलं. लग्न समारंभात फक्त पन्नास लोकांना परवानगी. पुन्हा सगळे नव्याने तयारीला लागले. कार्यालयात फोन लावले. पाहुणे पन्नास पण अटी हजार. चिंगी आणि घरच्यांनी धीर सोडला नाही. घराण्यात असं पहिल्यांदाच घडलं असेल. ‘नकटीच्या लग्नाला विघ्न फार’, अशी गत होती. 

लग्नाची तारीख नव्याने फायनल झाली. जे पर्याय उपलब्ध होते ते मनासारखे नव्हते. एक पटतंय तर दुसरं नाही. शेवटी एका नवीन रिकाम्या सोसायटीची टेरेस मिळाली. मुलाकडच्यांनी होकार दिला. 

डेकोरेशनचं प्लॅनिंग सुरु झालं. एका ताईने झेंडूची आयडिया दिली. कागदी पताका लावण्याची आयडिया आजोबांनी सांगितली. आजीने तिच्या जुन्या साड्या सजावटीला आणून दिल्या. चिंगी परत आनंदली. झाडून सगळे ‘इव्हेंट मॅनेजर’ बनले होते. साड्यांचं डेकोरेशन करून त्यावर फुलमाळा सोडल्या. गणपती डेकोरेशनसचे लाईट्स होते ते दादाने वापरले. एका झटक्यात टेरेसचं रूप पालटून गेलं. किती स्वस्तात आणि देखणं डेकोरेशन झालं होतं! 

मेहंदीवाली घाबरून आलीच नाही. मग घरच्या घरी हातावर मेहंदी काढू, असं ठरलं. घरातले सगळे रांगोळी काढायलाही तयार झाले. रांगोळीचे रंग घरी होतेच. वेलकम लिहून सुंदर गालीचा काढू, असं आई म्हणाली. मुलाकडचे येणार तर पायघड्या घालू, असं मावशी म्हणाली. अक्षता वाटायचं काम चिल्लीपिल्ली करणार, असं त्यांनीच ठरवून घेतलं. अश्या बारीक सारीक उपायांमुळे खर्च वाचला. एकापाठोपाठ एक प्रॉब्लेम सुटत गेले. नाजूक परिस्थितीत खूप धीराने लग्नाचा निर्णय घेतला होता. 

लग्नाच्या दिवशी सरकारी नियमांचं पालन अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे आमंत्रणाचा प्रश्न उभा राहिला. नवी यादी केली आणि काही पाहुणे फिक्स झाले. काहींचे चेहरे पडले. पण काही चिंगीसाठी खूष  झाले. राज्यांतर्गत वाहतूक बंद होती. त्यामुळे साहजिकच लांबचे पाहुणे येणार नव्हते. ते आले असते तर राहण्याची सोय करायला लागणार होती. त्यात खर्च होणार होता, तोसुद्धा वाचला. एकमेकांच्या घरी जाण्याचे रस्ते बंद होते. त्यामुळे भेटून आमंत्रण दिले गेले नाही. फक्त सोशल मिडीयावरून सगळ्यांना आमंत्रण पाठवलं गेलं. मुहुर्ताची वेळ ऑनलाईन पाठवण्यात आली. पत्रिका छापण्याची वेळ आली नाही.

हे सर्व झाल्यावर केटरिंगचा विषय आला. आता मोजून पन्नास लोकं जेवायला. त्यामुळे तिथे पण खर्च आटोक्यात आला. खरं तर किती खर्च झाले आणि किती उरले ते महत्त्वाचं नव्हतंच. निसटलेल्या परिस्थितीत चिंगीला सुख देणं महत्त्वाचं होतं. 

लग्नाचा दिवस उजाडला. वाजंत्री नव्हती तरी काही अडलं नाही. छोटूकडे online वाजंत्री होती. मुलाकडचे येताच फटाके वाजले. सगळ्यांनी स्वागत केलं. चिंगी आणि नवरा मुलगा बोहल्यावर चढले. सगळे नातेवाईक ऑनलाईन जॉईन झाले. जेवणाच्या पंगतीला सगळेच वाढपी बनले. कुठल्याच व्यक्तीने काम कमी लेखले नाही. 

मग लग्नं म्हटलं की खर्चाला उधाण का येतं? मुख्य गोष्टी सोडून आपण बाकीच्या गोष्टींना का महत्त्व देतो? किती घेतलं आणि काय दिलं याचं गणित का मांडतो?

चिंगीचं लग्न थाटात पार पडलं. भरपूर फोटो काढले गेले. थोडक्यात काय, ‘घरच्या घरी, समारंभ भारी’ असंच झालं. सगळ्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतलं. मुलाकडच्यांनी सुद्धा कुठलीच अपेक्षा ठेवली नाही. 

बघा ना, आपण एरवी लग्न बघतो तिथे किती भन्नाट अनुभव येतात. नुसता धिंगाणा, गोंधळ असतो. काहीच्या काही खर्च करून, लग्नसमारंभ साजरे केले जातात. साधं असं काही नसतंच. काही वेळेस शो ऑफ म्हणून समारंभ होतो. लग्न बाजूला राहतं आणि दिखावा आणि अहंकार डोकं वर काढतात. 

याउलट साध्या पद्धतीनं लग्नं झालं तर काही अपराधिपणा रहात नाही. जसं चिंगीच्या लग्नात झालं! काही गालबोट लावायला कारण मिळालं नाही. 

मग लग्नं म्हटलं की खर्चाला उधाण का येतं? मुख्य गोष्टी सोडून आपण बाकीच्या गोष्टींना का महत्त्व देतो? किती घेतलं आणि काय दिलं याचं गणित का मांडतो?

खर्च केला काय आणि नाही केला काय, नवीन जोडप्याचं सुख जास्त महत्वाचं. संसाराचा रथ एकत्रपणे ओढला जाणं महत्वाचं! 

चिंगीच्या लग्नाला आता दोन महिने झाले आहेत. नवऱ्यासोबत ती खूप आनंदात आहे. चिंगीमुळे सगळ्यांना ‘असं ही एक वेडिंग’ अनुभवायला मिळालं! कमी खर्चिक आणि मोजकेच पाहुणे…पण आनंद डबल!