Categories
Kavadse

घरटं

आधी दोघे जण आले मग अजून एक दोन जण आणि कोणत्या तरी दोघांनी शेवटी तिथे घरटे केले. घरटे केलंय म्हणजे अंडी पण देणार असं मी माझं ज्ञान पाजळले.

आपल्या जगात आधी लोन होतं आणि मग EMI रुपी काड्या जोडून अनेक वर्षांनी त्याचे घर होते. पण ह्या चिमण्यांचा मामलाच निराळा. सुरुवातीलाच सगळे कष्ट. एक एक काडी गोळा करून बनवलेलं घर.

आत मध्ये डोकावण्याची सोय नव्हती, नाही तर मी स्वभावानुसार चोंबडेपणा करून अंडी पण मोजली असती.

पुढे एक दिवस तो क्षण आलाच. म्हंणजे झालं असं की गौरी ची सवाष्ण होती त्यामुळे जेवायला उशिरा ये असे बायकोने फर्मान काढले होते. मी पण आज्ञा धारक मुला सारखा उशिरा आलो. पुरणपोळीचा पहिला घास घेणार तर, पावसाचे दाटून आलेले ढग भेदून सूर्याचा एक कवडसा त्या घरट्यावर पडला. चिमणी तोंडात अळी सदृश काही तरी घेऊन घरट्याच्या तोंडाशी बसली आणि आतून दोन भुकेल्या चोची बाहेर आल्या. मणी रत्नम च्या चित्रपटासारखे लाईट सेटिंग जे मगाशी झालं ते ह्या सीन साठी होतं तर. पुरणपोळीची गोडी त्या प्रसंगाने नक्क्कीच वाढली. यथावकाश ती पिल्लं बाहेर आली तसेच गॅलरी मध्ये उडायला पण शिकली. निसर्गाचं भान त्या पिलांना आणि त्यांच्या आई वडिलांना माणसापेक्षा कैक पटीने अधिक असावं. चिमणा चिमणी त्या पिलांना निसर्गाच्या स्वाधीन करून ऐके दिवशी उडून गेले आणि त्यांच्याबरोबर ती पिल्ले देखील उडाली. त्या पालकांना ना घरट्याचा मोह ना त्या पिलांचा. डार्विन च्या भाषेत, survival of the fittest वर त्यांचा विश्वास असावा.

आम्ही मात्र येता जाता त्या रिकाम्या घरट्यासाठी नवा भाडेकरू कधी येईल याची वाट पाहतोय.